घरात बसून काय करू -१७हात नका लावू राया नाकाला एका प्रसिद्ध वैद्यकीय मासिकात आलेला, ‘कोव्हिड, लाॅकडाउन नंतरची काळजी’ या लेखाचं सार माझ्या बहीणीला, वाचून दाखवलं. माझा भाचा, लगेच म्हणाला, “मामा हे सगळं माझी ममा मला खूप आधीपासून सांगते. तिला सगळं आधीच कळत. मला झोप आलेली, मला भूक लागलेली आणि माहित्ये का, मला शी येणार आहे हे पण तिला आधीच कळतं”हे ‘सार’ काय आहे ते बघूया. “प्राचीन काळात भारतात जगभरातून लोक ‘शिकण्यासाठी’ किंवा ‘भारत बघण्यासाठी’ येत. अशा लोकांमधे एक नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे चिनी प्रवासी ‘हुआंग श्वांग’. त्याने भारताबद्दल माहिती लिहून ठेवली आहे”. शाळेत असताना कुठच्यातरी धड्यात हे वाक्य होतं. त्या नावाच्या विचित्रपणामुळे ते लक्षात राहिले. नंतर चीनची ओळख, ही ‘हिंदी-चिनी’ भाईभाई ही घोषणा, १९६२ चे चीन बरोबरचे हरलेले युद्ध; या पुरती मर्यादित होती. मग कराटे, ज्यूदो वगैरे; दे मार पिक्चर्स मधून चीनचे नाव लक्षात राहिले. हे प्रकार जपानी, चिनी, कोरियन वगैरे असले तरी त्यांना चायनिज म्हटले जाई. मग चायनीज फूड भारतात पसरले. त्या नंतर प्रत्येक पदार्थावर,’मेड इन चायना’ असे दिसू लागले. सध्यातर सगळीकडे चायनीज व्हायरस ने धुमाकूळ घातल आहे. हुआन श्वांग ते चीनने जगावर सोडलेले कोरोनास्त्र असा भलामोठा चायनीज कॅनव्हास आहे.या कोरोनाव्हायरसमुळे लॅकडाउन हा नवीन प्रकार सगळ्यांच्या वाट्याला आला आहे. हे जास्ती दिवस चालू शकणार नाही. केव्हातरी सगळे घराबाहेर पडतीलच. तेव्हाही कोरोना काही अंतर्धान पावलेला नसेल. तेव्हा किती आणि कशी काळजी घ्यायची हे ही माहीत करून घ्यायला हवे. आपल्यामुळे इतरांना कोरोना होउ नये आणि इतरांमुळे आपल्याला कोरोना होउ नये ही खबरदारी तर घ्यायलाच हवी ना ?कोरोनाचे दोन मुख्य गूण १) साध्या (?) फ्लू पेक्षा हा तिप्पट जास्त संसर्गजन्य आहे. २) कोरोनाची लागण झालेल्या २५% लोकांच्यात काहीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांना त्रास न होताच ते बरे होतात पण ते इतरांना हा व्हायरस वाटत फिरू शकतात.या मुळे सगळीकडे भितीचे वातावरण आहे. बाहेरून घरात काहीही येउ नये, निदान स्वच्छ धुतां न येणाऱ्या गोष्टी घरात येउ नयेत म्हणून लोक खबरदारी घेत आहेत. वर्तमानपत्र घेणे बहुतेकांनी बंद केले आहे. (ही इष्टापत्तीच आहे असे अनेकांना वाटते. टीव्ही वरील बातम्या आणि चर्चा या पाहिल्याने कोरोना होतो असेही अनेकांना वाटते). अनेकजण तर नोटा ही धुवून घेत आहेत. पूर्वी पॅंटच्या खिशात नोटा राहिल्या आणि ती पॅंट धुवून आली तर लोक त्या नोटा वाळवून, मग रुमालाखाली ठेवून त्याला इस्त्री करून त्या नव्या कोऱ्याकरकरीत करीत असत, तो अनुभव आता उपयोगी पडतो आहे. लाॅकडाउन संपल्यानंतरही काही महिने, लोक मास्क वापरतील हे नक्की. काळजी आहे ती, माझा हात कुठेतरी लागला, कुणाचा हात मला लागला तर काय करायचे? उद्या ट्रेन, बस ने प्रवास करताना, कुठेही दरवाजा उघडून आत जाताना, वस्तू हाताळताना, भाजी, कपडे इतर वस्तूना हात लावताना मी किती घाबरायचे आणि किती काळजी घ्यायची ? याची उत्तरे आता आपण देउ शकतो ते कोरोना कसा पसरतो ते कळू लागल्यामुळे. कोरोना व्हायरस ज्याच्याकडे असेल, ( मग तो रोगलक्षणी किंवा लक्षणरहित असेल ) असा माणूस शिंकला, खोकला किंवा अश्रुपात करीत रडला तर; प्रचंड प्रमाणात कोरोनाव्हायरस सभोवतालच्या हवेत पसरतो. म्हणून मास्क घालणे हे अत्यावश्यक आहे, शिंक ही का कुणाला सांगून येते. खोकला आणि शिंक ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वावर अवलंबुन असतात हे मात्र अनेकांना मान्य नसते. शिंक किंवा खोकला या शक्तिप्रदर्शनासाठी नसून, फक्त श्वसनमार्गातील नको त्या गोष्टी बाहेर ढकलण्यासाठी असतात हेच बऱ्याच जणांना मान्य होत नाही. या क्रिया, ठरवले तर कमी आवाजात करता येतात हे मानायलाच असे लोक तयार नसतात. (परीक्षेला, समारंभात किंवा गंभीर प्रसंगात जर असे गगनभेदी शिंकासूर, त्यांनी मनात आणले तर कमी डेसिबल्समधे शिंकताना मी पाहिले आहे). लोकांची शिंक किंवा खोकला हा कोरोना व्हायरसला जास्तीत जास्त लांबवर पसरवायला मदत करतो. “शिंक जितकी जोरदार तितका कोरोनाचा लांब प्रसार”. बरे हे लोक मास्क वापरतात तो यांच्या शिंकण्याच्या किंवा खोकण्याच्या ताकदीपुढे फिका पडण्याची शक्यता जास्त असते. काही जण तर मास्क मधे खोकतां शिंकता येत नाही, घुसमटायला होते असे म्हणून मास्क काढून शिंकतात आणि पुन्हा मास्क लावतात. लाॅकडाउन नंतर आपल्या वागण्यातील बऱ्याच गोष्टी बदलायला लागणार आहेत, त्यातील एक, हे शिंकणे आणि खोकणे याच्या सवयी बदलणे; निदान माणुसकी म्हणून तरी बदलायला लागेल.कोरोनाबाधित माणूस बोलताना देखील त्याच्या शब्दांसोबत व्हायरस हवेत येउ शकतो पण ते प्रमाण फारच कमी असते. या शिंकखोकल्यातून व्हायरस शरीराबाहेर पडतो आणि सभोवतालच्या विविध पृष्ठभागांवर स्थिरावतो. तसाच तो बाधित माणसाने कुठेही स्पर्श केला तर तिथेही वस्ती करतो. अशा पृष्ठभागांवर बसून तो नवीन सावजाची वाट बघतो. कुणाचाही स्पर्श अशा पृष्ठभागाला झाला तर तो व्हायरस नवीन माणसाकडे येतो. त्या व्यक्तीचा हात चेहऱ्याला लागला की तिथून श्वसनमार्गात प्रवेश मिळवतो. एकदा का श्वसनमार्गात पोचला की तो अगणित प्रमाणात वाढतो. असा माणूस शिंकला, खोकला किंवा त्याने कुठेही स्पर्श केला की एक वर्तुळ पूर्ण होते. व्हायरस माणसाच्या शरीराबाहेर (outside of host) फार दिवस राहू शकत नाही, आणि बाहेर पडल्याशिवाय तो पसरू शकत नाही. या चक्रामधील काही जागा या व्हायरच्या सोयीच्या नसतात. एकतर कुठल्याही पृष्ठभागावर व्हायरस उतरले की त्यांचे विघटन चालू होते. व्हायरस त्या पृष्ठभागावर आल्यानंतर जितक्या उशिरा निरोगी माणूस त्या जागी स्पर्श करेल तितकी व्हायरसची संख्या आणि त्याची ताकद कमी झालेली असते. एका चाचणित असे आढळून आले आहे की पहिल्या तीस मिनिटात एकूण व्हायरसची संख्या ५०% कमी झालेली असते. याचा अर्थ असा नव्हे की पुढील अर्ध्या तासात उरलेले ५०% व्हायरस नष्ट होउन एका तासात पृष्ठभाग व्हायरसमुक्त होतो. व्हायरससाठी आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे, जर निरोगी मनुष्याने पृष्ठभागावरून व्हायरस अनावधानाने उचलला पण आपले हात, तोंड, नाक डोळे अशा ठिकाणी नेण्याआधिच साबणाने हात धुतले तर व्हायरसला शरीरात शिरकाव करता येत नाही. व्हायरससाठी आणखी वाईट गोष्ट म्हणजे जर असे पृष्ठभाग, साबणाच्या पाण्याने, स्टरलायझरने दर दोन तासाला कुणी धुतले तर व्हायरस टिकाव धरू शकत नाही. पदार्थ शिजवून खाल्ले, आपल्या चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी जर हात धुवून घेण्याची सवय लागली तर कोरोनाच्या प्रसारासाठी ती मोठा अडथळा ठरेल.कुठेही हात लावला आणि तो हात साबणाने धुवून मग चेहऱ्याजवळ नेला तर संसर्गाची भिती अतीशय कमी. कपडे कोमट पाणी आणि डिटर्जंटमधे धुतले तरी व्हायरस पासून इन्फेक्शन होत नाही. तर या सर्वांचे सार काय ? मास्कच्या सोबत उगाच इथेतिथे हात लावू नयेलावलाच समजा तर नाकातोंडात बोटं घालू नयेघालायची असतीलच तर प्रथम स्वच्छ हात धुवावेखाण्यापिण्याआधी हात स्वच्छ धुवावे.हे ‘सार’ ऐकून भाचा म्हणाला, “मामा, हे सगळं माझी ममा मला खूप आधीपासून सांगते.”हे सगळं आपल्याला पुढील वर्ष दोन वर्ष तरी कसोशीने पाळायला लागणार आहे.


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    wpChatIcon